Sanjay Pawar | Instagram @SanjayPawar

कोल्हापूर मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी रवीकिरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटात नाराजी टोकाला गेल्याचं पहायला मिळालं आहे. हर्षल सुर्वे यांनी शहर समन्वयक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेना उपनेते संजय पवार यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. 2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीमध्ये संजय पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. ही उमेदवारी थेट संभाजी राजे यांच्या विरोधात होती आणि तेव्हा शिवसेना पक्षाचे दोन तुकडे झाले होते. आता तेच संजय पवार जिल्हाप्रमुख निवडीने नाराज असून त्यांनी थेट उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

पक्षामधून जे आदेश आले त्याचे पालन झाले मात्र, गेल्या 10 वर्षांपासून भलतच काही घडत असल्याचे संजय पवार म्हणाले. जिल्हाप्रमुख निवड करताना विश्वासार्हता आणि पारदर्शकता तपासायला हवी होती असं संजय पवार यांनी नमूद केलं. संजय पवार यांनी विधानसभा निवडणुकीत षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप केला. संजय पवार म्हणाले की मधुरिमाराजे यांनी अचानक माघार का घेतली? राजू लाटकर यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांच्यासाठी देखील शिवसेना राबली होती. मात्र विधानसभेला मधुरिमाराजे यांनी माघार का घेतली होती? हे भविष्यात समोर येईल असं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर उत्तरसाठी संजय पवार आणि रविकिरण इंगवले इच्छूक होते. याच उमेदवारीवरून दोघांमध्ये वाद वाढला होता.

कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदासाठी नियुक्ती करताना उपनेत्याला माहिती नसेल तर काय करायचे? या पदाला किंमत काय? असा सवाल करत त्यांनी आपल्याला पद नको आपण सामान्य शिवसैनिक म्हणून काम करू अशी भावना देत संजय पवार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी आपण पक्षाचा राजीनामा देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हर्षल सुर्वे शिवसेनेमध्ये

संजय पवार यांनी आपण निवडीवर नाराज नाही पण निवड प्रक्रियेवर नाराज असल्याचं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. सध्या संजय पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे.