कडक शिस्तीचा पक्ष असे बिरुद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षातही बंडाचा झेंडा फडकल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजप (BJP) नामुष्कीजनकरित्या पराभूत झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी (BJP Leaders Demands Chandrakant Patil's Resignation) पक्षाचे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी केली आहे. या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे ही मागणी केली. नेतृत्वाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक गांभीर्याने घेतली नाही, असा आरोपही या पदाधिकाऱ्यांनी या वेळी केला.
कोल्हापूरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हटले की, पाटील यांनी सत्तेत असताना विविध पक्षांतील राजकीय नेते फोडून त्यांना भाजप प्रवेश दिला. या सगळ्या गोष्टी करत असताना भाजपमधील ज्येष्ठ नेते आणि त्यातही जो तळागाळातील कट्टर कार्यकर्त्यांनाही डावलण्यात आले. हे पक्ष प्रवेश देताना त्यांना विश्वासातही घेतले गेले नाही. त्यामुळे भाजपला पराभवाची फळे चाखावी लागली. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020 Results: तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने विजय; एकटे लढण्याची हिंमत नाही, चंद्रकांत पाटील यांचा महाविकासआघाडीला टोला)
पुढे बोलताना या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, पक्ष नेतृत्वाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी बाहेरुन आलेल्या आयारामांवर अधिक विश्वास ठेवला. निष्ठावंतांना विश्वासात घेतले नाही. आयारामांच्या जोरावर आपल्याला एकतर्फी विजय मिळेल असा विश्वास राज्यातील भाजप नेत्यांना वाटत होता. परंतू तसे घडले नाही. त्यातच नेतृत्वाने पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या पदाधीकाऱ्यांनी केली आहे.