Kohinoor Mills Case: उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांची पाठराखण, ईडीच्या नोटीशीबद्दल काय म्हणाले पाहा
Raj Thackera And Uddhav Thackeray | (Photo credit: Archived, edited, representative images)

कोहिनुर मिल प्रकरण: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने 'कोहिनुर स्क्वेअर' (Kohinoor Square) प्रकरणात नोटीस पाठवली. या नोटीशीनंतर राज ठाकरे यांचे बंधू शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Uddhav Thackeray) काय प्रतिक्रिया देतात याबाबत उत्सुकता होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी राज यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आणि ही उत्सुकता संपली. पण, त्यातून पुन्हा नवीच चर्चा सुरु झाली आहे. 'ईडीच्या (ED) चौकशीतून काही निघेल असे वाटत नाही', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानंत राजकीय पक्ष, नेते आणि पत्रकार, सामाजिक क्षेत्रात वापरणारे कार्यकर्ते अशा अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. बहुतांश राजकीय नेते आणि पत्रकारांनी राज ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान, या सर्वांत उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेबाबत उत्सुकता होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी राजकारणापेक्षा नातेसंबंधांना प्राधान्य देत राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे.

राज ठाकरे यांना नोटीस पाठविण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांना फारसा पटला नसावा, असा अर्थ या प्रतिक्रियेतून काढला जात आहे. तसेच, काही राजकीय विश्लेषकांचे म्हणने असे की, राज ठाकरे यांचे कोहिनुर प्रकरणातील व्यावसायीक सहकारी उन्मेश जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असणाऱ्या मनोहर जोशी यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे भाजपने ईडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनाही सूचक ईशारा दिला आहे. जर शिवसेनेच्या आणि त्यातही बाळासाहेब आणि उद्धव यांच्या जवळच्या नेत्याच्या मुलाला नोटीस जाते तर, भविष्यात ती उद्धव ठाकरे यांनाही जाऊ शकते, असाही अर्थ राजकीय विश्लेषकांनी काढला आहे. (हेही वाचा, मुंबई: राज ठाकरे 22 ऑगस्टला 'ईडी'च्या चौकशीला सामोरे जाणार; मनसे कार्यकर्ते करणार शक्तीप्रदर्शन)

एएनआय ट्विट

काय आहे प्रकरण?

मायानगरी मुंबईतील मध्यवर्थी असलेल्या दादर परिसरात 'कोहिनुर स्क्वेअर' या भव्य प्रकल्पातील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने राज ठाकरे कोहिनुर समूहाचे उन्मेष जोशी व राज यांचे भागीदार राजन शिरोडकर यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीनंतर ईडीने उन्मेष जोशी यांची काल (सोमवार, 19 ऑगस्ट 2019) रोजी सखोल चौकशी केली. ही चौकशी सुमारे साडेसात तास सुरु होती. आजही (मंगळवार, 20 ऑगस्ट 2019) जोशी यांची ही चौकशी सुरु आहे. आज उन्मेष जोशी यांच्यासोबत राजन शिरोडकरही उपस्थित आहेत. राज ठाकरे यांना ईडीने 22 ऑगस्ट ही तारीख दिली आहे. त्यामुळे 22 ऑगस्ट रोजी राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयात चौकशीला सामोरे जातील.