
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्यावर केलेले आरोप म्हणजे भाजपचे षडयंत्र (BJP's Conspiracy) आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे या षडयंत्राचे मास्टरमाईंड आहेत, असे प्रत्युत्तर हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिले आहे. किरीट सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. तसेच, या पुढेही मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगिले. सोमय्या यांच्या आरोपाला पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. या वेळी त्यांनी सोमय्या यांच्यावर 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले.
हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, किरीट सोमय्या यांना जिल्हाप्रवेश बंदीचा निर्णय जिल्हा प्रशासनाचा असेल. ते ज्या पद्धतीने आरोप करत आहे ते पाहता ते कोल्हापूरमध्ये आल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे जिल्हा प्रशासनाला वाटले असेल त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची कारवाई केली असेल. या आधीही अनेकदा अशा प्रकारच्या कारवाया झाल्या आहेत, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांच्याकडून 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप)
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यावर या आधिच्या आरोपाखाली 100 कोटी रुपयांचा आणि आज केलेल्या आरोपांविरोधात 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत आपल्या प्रकृतीची चौकशी केल्याबद्धल आपण त्यांचे आभार मानतो असेही मुश्रीफ यांनी म्हटले. कोल्हापूर जिल्ह्यातून भाजप भुईसपाट झाला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील घाबरले आहेत. त्यातून त्यांनी हे उद्योग सुरु केले आहेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले.