अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कारखान्यांवर आयकर विभागाकडून (Income Tax Department) कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, या कारवाईवरून विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तुम्ही पाप केले आहे. तुम्ही घोटाळे केले आहेत तर, कबूल करा, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
अजित पवारांशी संबंधित कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार शुगर या कारखान्यावर कारवाई सुरू आहे. ज्यामुळे राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. याचपार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, माध्यमांमुळे अजित पवार यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे कळाले. कशासंदर्भात धाडी टाकल्या जात आहे? हे फक्त अजित पवारच सांगू शकतात. तुम्ही पाप केले आहेत, घोटाळे केले आहेत, मग कबूल करा, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच अजित पवारच नाही तर महाराष्ट्र, देशातील कोणत्याही निर्दोष व्यक्तीला तपास यंत्रणांनी हैराण करु नये अशी आमची पण भूमिका आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- शाहरुख खान NCB चं पुढील टार्गेट; नवाब मलिक यांचा पुन्हा एकदा हल्लाबोल
छापेमारी कोणावर करावी, हा प्राप्तिकर विभागाचा अधिकार आहे. जर त्यांना काही संशय आहे. तर, ते छापेमारी करू शकतात. आम्ही दरवर्षी कर भरणारे आहोत. मी राज्याचा अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची असते, कोणताही कर कसा चुकवायचा नाही हे मला चांगले माहिती आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच आपल्यासह आपल्या बहिणींवर सुरु असलेल्या कारवाईबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.