Supriya Sule (Photo Credits-Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला शनिवारी सायंकाळी ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळे हिच्यावर शरद पवार यांच्या विरोधात फेसबुकवर अपमानास्पद पोस्ट शेअर केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तिच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. आता या या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘एक तरी मी त्यांना ओळखतही नाही. परंतु कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावे असे कोणी बोलते का? कुठल्या संस्कृतीत हे बसतं? हा संस्कृतीचा भाग आहे. या निमित्ताने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या तिघांचेही जाहीर आभार मानते. त्यांनी या कृतीच्या विरोधात भूमिका घेतली, यातून मराठी संस्कृती दिसते. आम्ही सगळ्यांनी मिळून यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘अशी वेळ कधी दुसऱ्या कोणावर जर आली तर मी स्वत: त्या कृतीच्या विरोधात उभी राहीन. कारण, ही जी विकृती सुरू झालेली आहे, ती समाजासाठी वाईट आहे. आज ती आमच्याबद्दल झाली उद्या ती तुमच्याबद्दल होऊ शकते. अशी जी प्रवृत्ती आहे तिचे कुठल्याही समाजात चांगली नाही किंवा त्याचे कोणी समर्थन करु शकत नाही.’ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज (रविवार) माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. (हेही वाचा: केतकी चितळे हिला पोलीस कोठडी, शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले)

दरम्यान, स्वप्नील नेटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात शनिवारी चितळे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आरोप केला आहे की, तिची पोस्ट दोन राजकीय पक्षांमधील संबंध बिघडवू शकते. पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांना पत्र लिहून चितळे हिच्यावर कारवाईची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, चितळेची इंटरनेट मीडिया पोस्ट बदनामीकारक आहे. तिने पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांची बदनामी केली आहे. या पोस्टमुळे अशांतता निर्माण होऊ शकते, त्यामुळेच आम्ही सायबर पोलिसांना पत्र देऊन तिच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.