Kartiki Ekadashi Special ST Bus: कार्तिकी एकादशी निमित्त आजपासून 1300 जादा एसटी बसची सुविधा; मुंबई, ठाणे रायगड सह 'या' ठिकाणहून प्रवाशांना घेता येणार लाभ
Kartiki Ekadashi Special Bus (Photo Credits: MSRTC)

Pandharpur Kartiki Ekadashi Special ST Bus:   विठ्ठल रखुमाईच्या भक्तांसाठी वर्षातील दुसरा महत्वाचा सण मानली जाणारी कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आता अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी या दिवशी मोठ्या संख्येत भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरी (Pandharpur) भेट देतात. महाराष्ट्र तसेच लगतच्या भागातून पंढरपूरला जाणाऱ्या या भक्तांच्या सोयीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा एसटी महामंडळाने 1300 जादा बसेस (ST Bus) सोडण्याचे ठरवले आहे. आज म्हणजेच 6 नोव्हेंबर पासून ते 12 नोव्हेंबर पर्यंत या अधिक गाड्यांच्या फेऱ्यांचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. कोकण (Konkan) प्रांत सहित मुंबई (Mumbai) , ठाणे (Thane)  या अधिक गर्दीच्या ठिकाणहून ही सेवा पुरवण्यात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, पंढरपूर कडे जाणाऱ्या एसटी बसच्या नियमित गाड्यांच्या सोबतीने या 1300 जादा बसेस धावणार आहेत. याशिवाय आवश्यकता भासल्यास स्थानिक एसटी स्थानकातून जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देखील महामंडळाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच पंढरपूर येथील बस स्थानकासोबतच चंद्रभागा नगर येथे विभागनिहाय तात्पुरत्या बस स्थानकाची सोय करण्यात येणार आहे.

भाविकांसाठी जादा गाड्यांची सोय

कोकण, रायगड या भागातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते मात्र याठिकाणहून सुटणाऱ्या गाड्या तुलनेने कमी आहेत, त्यामुळे यंदा रायगड येथून 100 , सिंधुदुर्ग मधून 30, तर रत्नागिरीतून 120 गाड्या सोडणार आहेत. याशिवाय मुंबई येथून 110 आणि ठाणे येथून 30 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

दरम्यान, मुंबई, पुणे आणि नांदेड येथून पंढरपूर कडे जाणाऱ्या जादा रेल्वे फेऱ्या सुद्धा प्रवाशांना उपलब्ध असणार आहेत. कार्तिकी एकादशीचा मुहूर्त जरी 8 नोव्हेंबर रोजी असला तरी तुलसी विवाह आणि कार्तिकी स्नान तिथी 12 नोव्हेंबर पर्यंत आहे तोपर्यंत पंढरपुरात भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळणार आहे.