मुंबई लोकल | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

मुंबईकरांचा रविवार मेगाब्लॉक (Megablock) मुळे अगोदरच उशिराने धावणाऱ्या लोकलची वाट बघण्यात जात असतो, त्यात आज मध्य रेल्वे वर आणखीन एक नव्या समस्येची भर पडली आहे. कल्याण (Kalyan) ते खडवली (Khadvali)  या स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने याठिकाणची रेल्वे सेवा वाढीव उशिराने सुरु आहे. परिणामी कल्याण, डोंबिवली (Dombivili) आणि पुढील सर्वच स्थानकांमध्ये प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. रविवार हा जरी सार्वत्रिक सुट्टीचा वार असला तरी काही कार्यालये सुरु असतात, किंवा अगदीच नाही तर फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी तर असतेच मात्र या लोकलविलंबामुळे सर्वांची चहलीच पंचाईत झाली आहे. या रुळांची डागडुजी करण्यासाठी मध्य रेल्वेचे कर्मचारी प्रयत्नात असून लोकल लवकरच पूर्वपदावर येतील असे सांगण्यात आले आहे.

वास्तविक या घटनेत आणखीन एक लक्षवेधी प्रसंग घडला आहे, आज सकाळी हा रेल्वे रुळाला तडा जाण्याचा प्रसंग घडताना काहीच वेळात या ट्रक वरून एक्सप्रेस ट्रेन धावणार होती, मात्र या बाबत अगदी शेवटच्या क्षणी माहिती मिळताच एक्सप्रेसचे लोको पायलट एस. मुरुगन यांना सूचित करण्यात आले. प्रसंगावधान दाखवून मुरुगन यांनी वेळीच एक्सप्रेसचा ब्रेक मारला आणि अनेकांचे प्राण वाचले. यासाठी मध्य रेल्वेने त्यांचे कौतुक करून त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे सांगितले आहे.

मध्य रेल्वे ट्विट

दरम्यान, मुंबईत, आज मध्य आणि हार्बर रेल्वे वर मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे तर पश्चिम रेल्वे प्रवाशांना या त्रासातून आज सुट्टी मिळाली आहे.  मुलूंड ते माटुंगा दरम्यान 11.30 ते दुपारी 4 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. अप जलद मार्गावर हा मेगाब्लॉक होणार आहे. तर, हार्बर रेल्वे - सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान 11.40 ते 4.10 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.