कडकनाथ कोंबडी घोटाळा: पाटण येथे गुन्हे दाखल; राज्यमंत्री सदाभाऊ खोतांचा मुलगा संशयित नाही, पोलिसांचा यू टर्न
सागर खोत (संग्रहित संपादित प्रतिमा)

आजकाल देशात कोणत्या गोष्टीत घोटाळा होईल काही सांगता येत नाही. सध्या महाराष्ट्रात गाजत आहे तो ‘कडकनाथ घोटाळा’ (Kadaknath Scam ). कडकनाथ कोंबडी पालन योजनेत हा घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सातारा जिल्ह्यातील पाटण येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये सुरुवातीला राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत (Sagar Khot) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता यू टर्न घेत पोलिसांनी चुकून हे घडल्याचे सांगून सागर खोत हे साक्षीदार असल्याचे म्हटले आहे.

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जवळजवळ दीड कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत इस्लामपूर येथील रयत ऍग्रो इंडिया व महारयत ऍग्रो इंडिया कंपनीचे संस्थापक सुधीर मोहिते संदीप मोहिते गणेश शेवाळे यांच्या विरोधात सचिन काशिनाथ शिर्के यांनी पाटण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यावेळी सदाभाऊ खोत यांच्या मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही चूक असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.

सातारा जिल्ज्यामध्ये एकूण 72 शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, कडकनाथ कुक्कुटपालन प्रकरणात राज्यभरात 8 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. यामध्ये तब्बल 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. ज्या व्यक्तीने ही फसवणूक केली आहे ती व्यक्ती राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. कडकनाथ कुक्कुटपालन प्रकल्पात गुंतवणूक करुन रक्कम दुप्पट, तिप्पट करून देतो असे आमिष शेतकऱ्यांना दाखवण्यात आले होते. (हेही वाचा: कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय घोटाळा: आठ हजार शेतकऱ्यांची 500 कोटींची फसवणूक; जवळच्या पोलीस स्थानकात दाखल करू शकता तक्रार)

या सर्व प्रकरणाबाबत राजू शेट्टी देखील आक्रमक झाले असून त्यांनी नुकतीच ईडीचे भेट घेतली होती. यामध्ये आपले नाव मुद्दाम गोवले गेले असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. हे एक राजकीय षडयंत्र असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.