पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्या म्हणजेच 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता समस्त देशवासियांना आपल्या दारात किंवा खिडकीत एक दिवा लावण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या संकट काळात देशातील जनतेच्या व विशेषतः निराधारांच्या मनात नैराश्य निर्माण झाले आहे. तेच दूर करण्यासाठी सर्वांनी पूर्ण 9 मिनिटे घरातील दिवे बंद करून बाहेर दिवा लावावा असे मोदींनी सांगितले आहे. मात्र त्यांच्या या उपक्रमावर विरोधी पक्षातील अनेकांनी टीकेचे अस्त्र उगारले आहे. यातीलच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad). एका फेसबुक पोस्ट मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मोदींच्या या दिये जलाओ उपक्रमाला विरोध केला. मोदींनी देशवासीयांनी घरात अंधार करण्यास सांगितले आहे मात्र अंधारात पाप घडतं आणि उजेडात पुण्य त्यामुळे कोणीही आपल्या घरातील लाईट्स बंद करू नये असे आव्हाड यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे तर त्याऐवजी या वेळी सर्वांनी आपल्या घरातील लाईट्स सुरु करून त्याच उजेडात मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीसाठी (CM Relief Fund- COVID 19) दान करावे. असा पर्याय त्यांनी सुचवला आहे.
जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट
"लाईट घालवून दिवे लावण्यात वेळ घालवू नका. उलट त्याक्षणी असतील त्या सगळ्या लाईट्स लावा. घरातल्या, दारातल्या, गॅलरी आणि बाल्कनीतल्या, गच्चीतल्या आणि सोसायटीतल्या, सगळ्या लाईट्स लावा.
जे लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त 101 रुपये द्या.
अंधार करू नका. अंधारात पाप करायची संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा".
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 4, 2020
दरम्यान, मोदींच्या या टास्क ला महाराष्ट्र ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सुद्धा विरोध केला आहे. जर का राज्यात सर्वांनी एकाच वेळी आपल्या घरातील लाईट्स बंद केल्या तर वीज पुरवठा केंद्रातील यंत्रणेवर तणाव पडून बिघाड येण्याची शक्यता आहे, आणि जर का असे झाले तर सर्व स्थिती पूर्ववत करण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागू शकतो असेही नितीन राऊत यांनी म्हंटले आहे. तर, या टीकांवर भाजपच्या राम कदम व किरीट सोमैय्या यांनी "जनता रात्री लाईट बंद करूनच झोपते, तेव्हा यंत्रणेवर दबाव येतो का?" असा सवाल केला आहे.