महाराष्ट्रामध्ये सत्तांतराच्या सुनावणीच्या अंतिम निर्णयाच्या आधी काही तास एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीची नोटीस (ED Summons) आली आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी या नोटीसीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मीडीयाशी बोलताना त्यांनी नोटीशीमध्ये प्रकरणाचा उल्लेख नाही. पण फाईल क्रमांकावरून पाहता त्यांनी ही नोटीस IL&FS प्रकरणी दिली आहे. या संस्थेकडे आपण कधी गेलो नाही आणि कर्जही घेतलं नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान जयंत पाटील यांच्या लग्नाचा काल वाढदिवस होता. त्या दिवशी संध्याकाळी 5 च्या सुमारास सही केलेली नोटीस घेऊन एक हवालदार 6 च्या सुमारास नोटीस घेऊन आला असल्याचं जयंत पाटील म्हणाले. आपण नक्कीच नोटीसीला उत्तर देणार आहोत. पण सध्या घरात जवळच्या नातेवाईकांची लग्न असल्याने अजून 2-3 दिवसांचा कालावधी घेणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
ईडीच्या नोटीसीमध्ये जयंत पाटील यांना 12 मे दिवशी ईडी कार्यालयामध्ये दाखल होण्यास सांगितले आहे पण आता पाटील वेळ वाढवून घेणार असल्याने पुढील आठवड्यात हजर राहू शकतात.जयंत पाटील यांनी मीडीयाशी बोलताना आपला ज्या कंपनीशी संबंध नाही त्याच्या प्रकरणात नोटीस आली आहे पण अशा ईडी नोटीसा का येतात? हे सर्वांना ठाऊक आहे असेही ते म्हणाले.
IL&FS प्रकरणी यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील चौकशी झाली आहे. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.