Jayant Patil | (Photo Credits: Facebook)

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अखेर शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आता जयंत पाटील यांच्या जागी नवे प्रदेशाध्यक्ष कोण असतील याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये आघाडी वर असलेले नाव शशिकांत शिंदे यांचे आहे. शरदचंद्र पवार पक्षाकडून नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी 15 जुलै दिवशी बैठकीचं आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान काही महिन्यांपासून जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्तता व्हावी याची जाहीर मागणी केली होती. जून महिन्यातच झालेल्या पक्षाच्या मेळाव्यामध्येही त्यांनी शरद पवारांसमोर ही विनंती केली होती.

एनसीपी मध्ये फूट पडण्याआधीपासून जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. जयंत पाटील हे शरद पवारांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. अनेक वर्षांपासूनचे ते पवारांचे निष्ठावंत आहेत. मात्र पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सलग दोन टर्म पूर्ण केल्यानंतर आता नव्या चेहऱ्याला संधी मिळावी, अशी मागणी पक्षात अनेकांनी केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता शरद पवार कोणावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देणार? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर

शशिकांत शिंदे देखील पवारांचा जवळचा मोहरा आहे. मास लीडर म्हणून शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. अनेक महत्त्वाच्या निवडणूकांमध्ये त्यांनी थेट निवडणूकीच्या रिंगणामध्येही आव्हान दिले आहे. शिंदे मूळचे सातारा येथील आहेत. आता त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका त्यांच्यासमोरील मोठं आव्हान असणार आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या भागात पक्षाला उभारी देण्याचं कामही त्यांना करावं लागणार आहे.

सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत. 2019, 2024  मध्ये त्यांचा विधानसभा निवडणूकीमध्ये पराभव झाला आहे.  सातारा लोकसभा मतदार संघातही त्यांना महायुतीचे उमेदवार उदयन राजे भोसले यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.

दरम्यान शशिकांत शिंदेंसोबतच राजेश टोपे आणि अनिल देशमुखांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र आता सार्‍यांचे लक्ष मंगळवारी होणार्‍या बैठकीकडे लागले आहे.