Jyakwadi Dam

ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा एकदा सुखावला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे नाशिकमध्ये नदी परिसरात पुरस्थिती पहायला मिळत आहे. या पावसामुळे गंगासागर धरण देखील भरले आहे. (हेही वाचा - Marathwada Farmers Suicide: मराठवाड्यात शेतकरी संकटात, कृषीमंत्र्यांच्या बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या)

मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत जायकवाडीतील जलसाठा 34.28 टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या जायकवाडी धरणात 13 हजार क्यूसेक आवक सुरू आहे. पावसाअभावी यंदा मराठवाड्यात दुष्काळाचे सावट असताना जायकवाडी धरणाच्या वरच्या भागातील धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

नाशिक जिल्हयातील गंगापूर धरणासह अन्य धरणातून गोदावरीच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाणी प्रवाहित झाले आहे. रविवारी जायकवाडीत 15 हजार 925 क्युसेक क्षमतेने आवक झाली.