पश्चिम महाराष्ट्रातील सांगली (Sangli District) जिल्ह्यात पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. पाणीप्रश्नावरुन आक्रमक झालेल्या जत (Jat Taluka) तालुक्यातील 46 गावांनी मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही पाण्यासाठी धडपडत आहोत. आता पाण्याचा प्रश्न निकालात काढल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धारच या गावकऱ्यांनी केला आहे. जत तालुका हा सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात येतो. या तालुक्यासोबत खानापूर, आटपाडी, कवटेमंकाळ हे तालुकेही सतत दुष्काळाच्या छायेत असतात. त्यात जत तालुक्यात असलेली पाणी टंचाई ही भीषण आहे.
प्राप्त माहितीनुसार, जत तालुक्यात 100 टँकर पाणी पुरवठा करत आहे. परंतू, जत तालुक्याची पाण्याची तहाण भागविण्यासाठी हे टँकर अपूरे पडत आहेत. नाही म्हणायला म्हैसाळ सिंचन योजना या तालुक्यात काही पाणी पोहोचवते. पण, तेही पुरेसे नाही. या योजनेपासून वंचित असलेली 46 गावं पाण्यासाठी आजही टाहो फोडत आहेत. या गावांना पाणी योजनेचा कोणताच लाभ पोहोचला नसल्याचे हे गावकरी सांगतात. या गावांना शेजारचे राज्य असलेल्या कर्नाटक मधून पाणी देण्याचा निर्णय झाला पण, तोही फारसा वास्तवात आला नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोश खदखदतोय.
दरम्यान, या 46 गावांतील पाण्याच्या प्रश्न धसास लावण्यासाठी जत तालुक्यातील अध्यात्मिक गुरु तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी लढा उभारला आहे. पाण्यासाठी या गावातील ग्रामस्थ आता पायी दिंडीद्वारे मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहेत. ही दिंडी जत तालुक्यातील संख गावातून सुरु झाली आहे. या गावात सुमारे 400 ते 500 हून अधील लोक सहभागी झाले आहेत. ही दिंडी असंगी, गुड्डापूर, सोरडी, वळसंग मार्गे दुपारी जतमध्ये ही दिंडी पोहचली. या दिंडीने जत तालुका तसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. (हेही वाचा, नाशिक, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी; पुढच्या आठवड्यात राज्यात मान्सून दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज)
दरम्यान, शनिवारी सकाळी निघालेली ही दिंडी 20 जून रोजी मुंबईमध्ये दाखल होणार आहे. काही झाले तरी आपण मंत्रालयापर्यंत पोहोचणारच असा या गावकऱ्यांचा निर्धार आहे.