
मुंबई (Mumbai), देशातील एक महागडे शहर. मुंबईमध्ये रोजच्या जीवनातील गोष्टीही इतक्या महागल्या आहेत, तिथे जमिनीच्या किमती तर आकाशाला भिडल्या आहेत. बांद्रा, अंधेरी अथवा दक्षिण मुंबई याठिकाणी घर घेण्याचा विचार सर्वसामान्य लोक करूच शकणार नाहीत. अशात जापानी कंपनी सुमितोमो (Sumitomo) ने मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (BKC) तीन एकर प्लॉटसाठी 2,238 कोटी रुपयांची बोली लावली आहे. या हिशोबाने ही कंपनी प्रति एकर साठी 745 कोटी रुपये देणार आहे. ही देशातील रियल इस्टेट सेक्टरमधील सर्वात मोठी जमीन डील समजली जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, जो प्लॉट सुमितोमो ग्रुप ने खरेदी केला आहे त्याची रिझर्व प्राइज 3.44 लाख रुपये प्रति वर्ग मीटर आहे. पूर्वी 2010 मध्ये लोढा ग्रुपने वडाळामधील एमएमआरडीए च्या 6.2 एकर प्लॉटसाठी 4,050 कोटी रुपयांची बोली लावली होती. म्हणजेच प्रति एकरसाठी 653 कोटी रुपये मोजण्यात आले होते. आता या डीलचा विक्रम मोडत सुमितोमो ग्रुप सर्वात महागडा करार करण्याच्या मार्गावर आहे.
सध्या रियाल इस्टेट क्षेत्रात बरीच मंदी असल्याने ही जमीन कोणी विकत घेतली नव्हती, आता ही जपानी कंपनी हा प्लॉट विकत घेत आहे. मात्र सुमितोमो ने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्ससारख्या प्राइम कमर्शियल मधील जमिनीसाठी खूप जास्त किंमत मोजली असल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा: सरकारी जमीन हडपल्या प्रकरणी अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा)
दरम्यान, या कंपनीच्या वेबसाइटनुसार, सुमितोमोची स्थापना 1919 मध्ये झाली होती. 2019 मध्ये ही कंपनी 100 वर्षे पूर्ण करेल. कंपनीचे जपान, आशिया, ओशनिया, युरोप आणि मध्य पूर्व मध्ये व्यवसाय आहेत.