Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

पोटच्या मुलानेच आपल्या आईवडीलांवर कुऱ्हाडीचे घाव घालून हल्ला केला आहे. या घटनेत आई जागीच ठार झाली आहे. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना जालना (Jalna District) जिल्ह्यातील बदनापूर तालुका (Badnapur Taluka) हद्दीत येणाऱ्या गोकुळवाडी तांडा (Gokulwadi Tanda) या गावात गुरुवारी (2 जानेवारी 2020) रात्री नऊ वाजणेच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार उपस्थित होत पोलिसांनी आरोपीस घटनास्थळावरुन ताब्यात घेतले आहे. आरोपीस लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. दरम्यान, आरोपीहा हल्ला झालेल्या दाम्पत्याचा मुलगा असून, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्या भरातच त्याने हल्ल्याचे कृत्य केले असावे, असा प्रथामिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तम घुमाजी चव्हाण (वय 70) व ठकूबाई उत्तम चव्हाण (वय 60) असे हल्ला झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य बदनापूर तालुक्यात गोकुळवाडी तांडा येथे मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करत असते. त्यांना एकूण 3 मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा त्याच्या सासुरवाडीस राहतो. दुसरा मुलगा या दाम्पत्याच्या शेजारी राहतो. हा मुलगाही शेतमजुरी करुनच उदरनिर्वाह करतो. त्यामुळे सध्या तो उसतोडीच्या कामासाठी गावाबाहेर गेला आहे. तर, तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा दिलीप उत्तम चव्हाण (वय 36) हा मनोरुग्ण आहे. त्यामुळे उत्तम याला त्याच्या पत्नीने सोडले आहे.

प्राप्त माहितीनुसार, उत्तम घुमाजी चव्हाण (वय 70) व ठकूबाई उत्तम चव्हाण (वय 60) हे दोघे 2 जानेवारी या दिवशी रात्री जेवण झाल्यावर झोपण्यासाठी गेले होते. इतक्यात मनोरुग्ण असलेला मुलगा दिलीप हा तिथे आला आणि त्याने आई वडीलांवर कुऱ्हाडीने एकापाठोपाठ घाव घातले. या घटणेत ठकूबाई चव्हाण यांजा जागीच मृत्यू झाला. तर, वडील उत्तम घुमाजी चव्हाण हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, या दाम्पत्यासोबत असलेल्या नातेवाईक महिलेने आरडाओरडा केल्याने शेजारी घनास्थळी दाखल झाले. त्यांनी उत्तम चव्हाण यांना रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांत कळवले.

आई वडीलांवर वार करुन आरोपी घरात दडून बसला होता. पोलिस त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आरोपी हा घराच्या दरवाजाला आतून कडी लाऊन बसला होता. त्यामुळे घराचे पत्रे काढून पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, उत्तम चव्हाण यांच्यावर जालना येथील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.