Dead| Photo Credit - Pixabay

जालन्यातील (Jalna) अंबड तालुक्यातील शहागडमध्ये चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, ज्योती दिलीप भारस्कर असे मृत महिलेचे नाव आहे. तर पत्नीची हत्या केल्यावर घटनास्थळावरून संशयित आरोपी दिलीप गणपत भारस्कर हा फरार झाला आहे. सध्या पोलिसांकडून त्याचा शोध हा घेतला जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ज्योती भारस्कर आणि दिलीप भारस्कर यांच्या विवाहाला 14 वर्षे झाली आहेत. लग्न झाल्यावर सुरुवातीला त्यांचा संसार चांगला चालला. दरम्यान, त्यांना तीन अपत्य झाली. मात्र, काही वर्षांपासून दिलीप भारस्कर हा ज्योती भारस्कर यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे यावरून त्यांच्यात वाद देखील होत असे, तर सोबतच कौटुंबिक वादही सुरू होता. अशी माहिती मिळाली आहे. काही दिवसांपासून दिलीप भारस्कर हा ज्योती भारस्करसोबत शहागड येथील डोंगरे वस्तीवरील वीटभट्टी येथे काम करीत होते.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ज्योती भारस्कर आणि दिलीप भारस्कर या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की, दिलीप भारस्कर याने रागाच्या भरात थेट ज्योती भारस्कर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात ती जागीच ठार झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड येथील रुग्णालयात पाठवला.