महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराची रणधुमाळी आज (18 नोव्हेंबर) संपत आहेत. त्यामुळे प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी जोरदार डागल्या जात आहे. दरम्यान, प्रचार ऐन भरात असताना जळगाव (Jalgaon) शहरातून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार (Independent Candidate) शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार (Jalgaon ) केला आहे. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी एकाच वेळी बंदुकीतून तीन फैरी झाडल्या. त्यानंतर घटनास्थळावरुन पोबारा केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी हजेरी लावत आढवा घेतला आहे. प्राप्त माहिनुसार घटनास्थळावर रिकामी काडतुसे आढळून आल्याचे समजते.
पहाटेच्या अंधारात हल्ला
शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणूक 2024 च्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज पहाटे 4 च्या सुमारास त्यांच्या घराव अज्ञाताने गोळीबार केला. ज्यामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा आढवा घेऊन तपास सुरु केला आहे. प्राप्त माहतीनुसार, गोळीबार झाला तेव्हा उमेदवार घरातच होता. गोळीबाराचा आवाज ऐकून तो खडबडून जागा झाला असता त्याला घराच्या खिडकीचे तावदान फुटल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, त्याने शोध घेतला असता तिथे तीन रिकामी काडतुसेही आढळून आली. (हेही वाचा, Nawab Malik's Twitter Account Hack: नवाब मलिक यांचे ट्विटर अकाऊंट हॅक; फॉलोअर्संना केलं 'हे' खास आवाहन)
जळगाव शहर हादरले
शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन हे अपक्ष उमेदवार असले तरी ते, AIMIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. पक्षाकडून त्यांना अधिकृतरित्या उमेदवारी न मिळू शकल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ते अपक्ष म्हणूनच उमेदवारी करत आहेत. त्यांच्या घरावर अज्ञातांनी केलेल्या अचानक हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. त्यांचे समर्थक आणि परिसरातील प्रतिष्ठीत नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. हा हल्ला कोणी केला असेल याबाबत पोलीस कसून शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला सदर उमेदवारास पोलीस संरक्षण मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक 2024 प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज सायंकाळपासून आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे जाहीर प्रचार, पदयात्रा किंवा सभा यांना बंदी असेल. सहाजिकच उमेदवारांना भूमिगतरित्या काम करावे लागेल. दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष मतदानास अवघे काहीच तास शिल्लख राहिले आहेत. परवा म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील जनता राज्य विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह म्हणजे विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान करेन. ज्याची मतमोजणी येत्या 23 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहे.