Jalgaon Accident: जळगावात पुलाचा कठडा तोडून दुचाकी कोसळून झालेल्या अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जळगावात एका अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. गावात असलेले लग्न कार्यासाठी जात असताना या दोन युवकांवर काळाने घाला घातला. यात रस्त्यावर असलेल्या पुलावर दुचाकी अनियंत्रित होऊन कठडा तोडून थेट पुलाच्या खाली कोसळली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. भडगाव तालुक्यातील नालबंदी गावाजवळील पुलावर हा अपघात घडला. संतोष भिल (वय 35) व गोकुळ रमेश सोनवणे (वय 35) असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. (हेही वाचा - Pune Porsche Accident Case: पुणे पोर्शे दुर्घटनेत अल्पवयीन मुलास जामीन देणाऱ्या ज्युवेनाईल बोर्ड सदस्यांची होणार चौकशी; समिती गठीत)

गावातील एका लग्नाला जात असताना दुचाकी पुलाचे कठडे तोडून खाली गेल्याने दोघेही पुलाच्या खाली पडले. यात संतोष भिल याचा जागीच मृत्यू झाला होता. तर गोकुळ सोनवणे हा गंभीर जखमी झाला होता. (Jalgaon) जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान या दोन युवकांच्या मृत्यूनंतर गावावर शोककळा पसरली आहे. गावातील दोन कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने गावातील या दोन घरातील लोकांनी आक्रोश केला आहे. गावातील या अपघातानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.