JP Nadda (Photo Credits: IANS)

नवी मुंबईमध्ये रविवारी (16 फेब्रुवारीला) झालेल्या भाजपच्या राज्यव्यापी महाअधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह सर्व दिग्गज नेत्यांनी महाविकासआघाडीविरुद्ध एल्गार पुकारला. यावेळी अधिवेशनाला उपस्थ्ति असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J.P.Nadda) यांनी "महाराष्ट्रातील खोट्या महाविकासआघाडी विरुद्ध भाजपा एकटी लढा देणार" असे घोषित केले. त्याचबरोबर आपल्या पक्षाची यापुढे काय भूमिका असेल हे देखील स्पष्ट केले. नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या महाअधिवेशनात आलेल्या दिग्गज नेत्यांनी ठाकरे सरकार आणि महाविकासआघाडीवर जोरदार टिका केली.

"येथे एका विरुद्ध अनेक असे चित्र निर्माण झाले असून ही वेळ महाविकासआघाडीविरुद्ध लढण्याची आहे", असे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सांगितले. ही आघाडी करून शिवसेनेने महाराष्ट्राचा अपमान केला आहे. इतकचं नव्हे तर हे सर्व शिवसेनेने स्वत:च्या स्वार्थासाठी केले आहे असे नड्डा यावेळी म्हणाले.

हेदेखील वाचा- 'तुमच्यात हिंमत असेल तर, पुन्हा निवडणूक लढू...' विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर टिकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनणार असं वचन शिवसेनाप्रमुखांना दिलं असतं तर त्यांनी हे कधीच मान्य केलं नसतं अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर टिकास्त्र सोडले. तसेच आता विश्वासघात झाला म्हणून आता रडत न बसता लढायचे आहे असा सल्ला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना यावेळी दिला. नवी मुंबईतील भाजपच्या राज्यव्यापी महाअधिवेशन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा कार्यकर्ता हा बारूद आहे, असे सांगत भाजप कार्यकर्त्यांची स्तुती केली. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही असे सांगून अयोध्येत लवकरच भव्य असे राम मंदिर उभारण्यात येणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महिला आणि शेतक-यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारविरोधात येत्या 22 फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.