IPS  Officials Tried Overthrow Thackeray Government: राज्यातील आयपीएस अधिकारी महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट
Maha Vikas Aghadi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, राज्यातील काही आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी होऊन गेल्या पण आता यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करु इच्छित नाही, असे असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. दैनिक लोकमत ऑनलाइनच्या ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी हा गौप्यस्फोट केला.

पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांकडून सरकार पाडण्याचे प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या माहितीत कितपत तथ्य आहे, खोरोखरच असे घडले होते का आणि घडले असेल तर त्यावर कशी कार्यवाही करण्यात आली. हे सर्व कसे थोपवले, असा प्रश्न गृहमंत्री देशमुख यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरादाखल गृहमंत्री बोलत होते. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Election Affidavits: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासण्याबाबत निवडणूक आयोगाची CBDT कडे विनंती)

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, एकदमच मला असे सर्व काही जाहीर सांगता येणार नाही. परंतू, राज्य पोलीस दलातील अनेक अधिकारी चांगले आहेत. पण काही अधिकारी असतात. त्यांचे आणि राजकीय लोकांचे अगदी घनिष्ठ संबंध असतात. त्यातून असे प्रयत्न होत राहतात. पण आता त्यावर मला काही बोलाचे नाही, असे गृहमंत्री म्हणाले.

दरम्यान, गृहमंत्री देशमुख यांनीच पुढे माहिती देत सांगितले की, राज्यातील काही चार-पाच वरिष्ठ अधिकारी हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. यात एका अतिवरीष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हे अधिकारी आमदारांना धमकावत असल्याचा व दबाव टाकत असल्याचा प्रकार पुढे आला. त्यानंतर या प्रकरणात थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचात प्रदीर्घ चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळण्यात आले.