सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचे (Ganeshotsav 2020) पवित्र वातावरण आहे. उद्या, 22 ऑगस्ट रोजी घरोघरी गणपतीचे आगमन होणार आहे. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. मुंबई (Mumbai) मध्ये सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांची पूर्ण तपासणी होणार आहे. या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती केली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात विविध मंडळांतर्फे उत्सव साजरे केले जातील, त्या अनुषंगाने उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.
विभागनिहाय तपासणी पथक –
ए विभाग – मीनल दळवी, तहसीलदार तथा रचना व कार्यपध्दती अधिकारी, मुंबई शहर
बी विभाग – प्रसाद कालेकर, नायब तहसीलदार, मलबार हिल विधानसभा मतदार संघ
सी विभाग – अश्विनकुमार पोतदार, तहसीलदार करमणूककर वसुली शाखा
डी विभाग – अशोक सानप, नायब तहसीलदार, अति/निष्का धारावी विभाग
ई विभाग – प्रकाश भोसले, नायब तहसीलदार निवडणूक शाखा
एफ नॉर्थ विभाग – एम आर जाधव, नायब तहसीलदार सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघ
जी विभाग – एम. आर. वारे, वरळी विधानसभा मतदार संघ
जी नॉर्थ विभाग – श्याम सुरवसे, तहसीलदार, निवडणूक शाखा,
एफ साऊथ विभाग – आशा तामखेडे, तहसीलदार जमीन महसूल वसूली शाखा
मंडप तपासणी बाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार, महानगरपालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक सण, उत्सव, समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप तपासणीबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा त्यावरील अधिकाऱ्यांच्याचे मंडप तपासणी पथक गठीत केले जाते. उत्सव सुरु होण्यापूर्वी मंडप तपासणी करुन त्याचा अहवाल संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करणे आवश्यक आहे. यानुसार मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 3 समिती व 9 पथकांची नियुक्ती केली आहे. (हेही वाचा: सिद्धविनायक मंदिर ट्रस्टकडून सरकारला करण्यात आलेली 10 कोटींची मदत वादाच्या भोवऱ्यात, मुंबई उच्च न्यायालयाने बजावली नोटीस)
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, गणेश चतुर्थी कार्यक्रमांची परवानगी नाकारली गेली आहे. अशा उत्सवांच्या वेळी होणारी गर्दी नियंत्रण करणे अवघड ठरते, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.