Devendra Fadnavis And Indurikar Maharaj (Twitter)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या महाजनादेश यात्रेतील (Mahajanadesh Yatra) तिसऱ्या टप्प्यात संगमनेर (Sangamner) येथे झालेल्या सभेत इंदुरीकर महाराजांची (Indurikar Maharaj) उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली होती. फडणवीस यांनी सुद्धा आपल्या ट्विटर वरून हा फोटो शेअर केला होता. यानंतर अवघ्या काहीच वेळात आता इंदुरीकर महाराज सुद्धा भाजपा (BJP)  प्रवेशाच्या वाटेवर आहेत की काय अशा चर्चा सुरु झाल्या इतकेच काय तर येत्या विधानसभा निवडणुकीत इंदुरीकर हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या विरुद्ध लढणार आहेत असेही अनेक ठिकाणी म्हंटले जाऊ लागले होते. या सर्व चर्चांना विराम देत अखेरीस इंदुरीकर यांनी आपली बाजू आज माध्यमांसमोर मांडली आहे. राज्यात पूरग्रस्त स्थितीमुळे वाताहात झाली असताना आपल्या वतीने मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीत (CM Relief Fund) योगदान देण्यासाठी आपण फडणवीस यांची भेट घेतली असे त्यांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, महाजानदेश यात्रेत सहभागी होऊन इंदुरीकर महाराजांनी फडणवीस यांच्याकडे 1  लाख रुपयांचा धनादेश सोपवला आहे. तसेच मी आयुष्यभरासाठी समाजकारणाचा वसा हाती घेतला आहे त्यामुळे राजकारणात प्रवेश घेणे कधीही शक्य नाही तसेच परिणामी निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उभा राहत नाही असाही खुलासा त्यांनी केला. (उदयनराजे भोसले यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर NCP आमदार जीतेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया; शरद पवारांनी बालिश चाळ्यांना पाठीशी घातलं म्हणत टीकास्त्र)

साहजिकच कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू मनात न ठेवता मी या यात्रेत सहभागी झालो होतो. मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द केल्यानंतर कोणत्याही पक्षाची मफलर गळ्यात न घालता मी कार्यक्रमातून निघून गेलो . मला राजकारणात उतरायचे असते तर मी कार्यक्रम संपेपर्यंत तिथे थांबलो असतो, असे स्पष्टीकरण देत इंदुरीकर महाराजांनी आपल्या राजकारणात प्रवेशाशी संबधित सर्व वृत्त अफवा असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, संगमनेर मतदारसंघ हा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा म्हणजे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. पंचायत समिती, जि.प. नगरपालिका, अनेक ग्रामपंचायती आणि स्थानिक संस्थावर थोरात यांनी आपले वर्चस्व गाजवले आहे. तर इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनाच्या शैलीने सर्वत्र गाजले आहेत.