
संकट कितीही मोठे असले तरी भारताचे संस्कार हे निःस्वार्थ भावाने सेवा करण्याची प्रेरणा देतात असे मोदी सांगतात. तेव्हा त्यांच्या भक्तांनी विरोधकांकडे डोळे वटारून पाहण्याची गरज नाही, असे म्हणत शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे. यासोबतच ''मोदी चीनविषयी बोलतात व त्यांचे लोक विरोधकांकडे वाकड्या नजरेने पाहतात. कुछ तो गडबड है! करोनाप्रमाणे ‘ट्यून’ येथेही बदलायलाच हवी'', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारलाही शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना संपादकीयातून (Saamna Editorial) टोला लगावला आहे.
'ट्यून बदला हो' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात सामना संपादकीयामध्ये म्हटे आहे की, ‘करोना व्हायरसशी आज संपूर्ण देश लढत आहे. पण लक्षात ठेवा, आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही!’ जसा या ट्यूनचा लोकांना कंटाळा आला आहे तसा चीनप्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या ट्यून युद्धाचाही कंटाळा आला आहे. ‘आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही’ अशी एक कॉलर ट्यून कोणीतरी दिल्लीत सतत वाजवायला हवी असेही सामनामध्ये म्हटले आहे.
सामनामध्ये पुढे लिहिले आहे की, सीमेवरील गलवान खोर्यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी सरकार पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व काँग्रेस पक्षालाच सडेतोड उत्तरे देत बसला आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून निधी मिळाला. चीन व काँग्रेसचे नाते काय? असे प्रश्न भाजपकडून विचारण्यात आले. यावर काँग्रेसने प्रतिटोले मारले. पंतप्रधान केअर्स फंडला चिनी कंपन्यांकडून शेकडो कोटी रुपये आले आहेत व सध्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या खात्यातही चिनी कंपन्यांकडून पैसे जमा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. म्हणजे आम्ही म्हणतोय तो मुद्दा हाच आहे. चीन सीमेवर चौक्या आणि बंकर्स उभे करीत आहे आणि देशात भाजप विरुद्ध काँग्रेस असे युद्ध रोज सुरू आहे.
चीन सीमेवर चौक्या आणि बंकर्स उभे करीत आहे आणि देशात भाजप विरुद्ध काँग्रेस असे युद्ध रोज सुरू आहे. आपल्याला चीनशी लढायचे आहे हे बहुतेक सगळेच विसरलेले दिसतात. या सगळ्या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली आहे ती अशी की, ‘देशाची सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे विषयांत कोणी राजकारण करू नये. हे बरे नाही.’ पवार यांनी हा टोला काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनाच लगावला असे भाजपपुरस्कृत समाज माध्यमांवर पसरवले जात आहे. चिनी घुसखोरीचे राजकारण करू नये, हे पवारांचे म्हणणे बरोबर! पवारांचा हा टोला सरकार पक्षालाही लागू पडतो, असेही सामनामध्ये म्हटले आहे.