पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुठा नदीच्या (Mutha River) वरच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठा बुधवारी सकाळपर्यंत 12.23 टीएमसी झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणांमध्ये 8.79 टीएमसी पाणीसाठा होता. खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) मुठा नदीत पाणी सोडले जात असतानाही पाणीसाठ्यात ही वाढ झाली आहे. मुठा नदीच्या वरच्या बाजूस पुणे शहराला सर्वात जवळचे धरण असलेले खडकवासला धरण क्षमतेनुसार भरले असून, प्राधिकरणांना 11,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास भाग पाडले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास मुठा नदीत आणखी पाणी सोडले जाईल, असा इशारा जिल्हा जलसंपदा विभागाने जारी केला असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. हेही वाचा Maharashtra Rain Update: मुसळधार पावसामुळे वर्ध्यातील कच्छा वान धरण फुटले, 3 गावात शिरले पाणी
पुणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात आवक होऊन पाणीसाठा वाढला आहे. गेल्या 24 तासात पानशेत 93 मिमी, वरसगाव 88 मिमी, टेमघर 160 मिमी आणि खडकवासला धरणात 38 मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेने (PMC) 26 जुलैपर्यंत सामान्य पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.