अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतिय तरुणास मनसेचा चोप (प्रतिमा सौजन्य- सोशल मीडिया)

ठाणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीय तरुणास भर पत्रकार परिषदेत चोप दिला. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप या तरुणावर होता. एका अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न या नराधमाने केला होता. या घटनेचा प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला होता. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी त्याला चोप दिला होताच. पण, हा नराधम पळून गेला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान, या नराधमास पकडून मनसेने चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हा नराधम मूळचा बिहारचा आहे. त्याने यापूर्वीही ठाण्यात तीन लहान मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता, असा दावा मनसे स्थानिक नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर 'गुजरातची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको. किती दिवस या लोकांना सहन करायचे ?. जर हे प्रकार थांबवले नाही तर उत्तर भारतीयांना मारुन मारुन इथून बाहेर काढू', असा इशारा देतानाच 'उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमधूनच मुंबईत घाण येते', अशी टीकाही मनसेने या वेळी केली. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रयत्नाची घटना घडली तेव्हापासून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत होते. मात्र, ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी व्हिडिओत दिसणाऱ्या 'त्या' आरोपीला पत्रकार परिषदेत आणले. तसेच, त्याला चोपही दिला.

आता बलात्कारासारख्या घटनांनाही मराठी अमारठी असा रंग देणार काय? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारताच, 'आम्ही बलात्कारासारख्या घटनांना जातीय रंग देऊ इच्छित नाही. पण, अशा मनोवृत्तीच्या लोकांना चोप देणं हा आमचा उद्देश आहे. ठाण्यात बलात्काराच्या जेवढ्या मोठ्या घटना घडल्या त्यात सर्वाधीक घटनांमध्ये उत्तर भारतीय लोकच आहेत ही वस्तूस्थिती आहे. आमच्या मुलींनी हे किती दिवस सहन करायचे?' असा सवाल विचारत 'हे प्रकार जर थांबले नाहीत तर, या लोकांना आम्ही मारुन मारुन बाहेर काढू', असा इशाराही मनसेकडून या वेळी देण्यात आला.