पुरुषांची वटपौर्णिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

आज मोठ्या उत्साहात राज्यात सर्व ठिकाणी वटपौर्णिमेचा (Vat Purnima) सण साजरा होत आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळूदे, पतीचे आयुष्य वाढूदे म्हणून स्त्रिया वटसावित्रीचे व्रत (Vat Savitri) करतात. या व्रतात वडाला सात फेऱ्या मारून, दोऱ्याचे वेष्ठन बांधले जाते. मात्र पुण्यात आता पुरुषही या प्रथेत सहभागी झाले आहेत. पुण्यात स्त्रियांच्या सोबतच पुरुषांनीही जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वडाला फेऱ्या मारून वटसावित्रीचे व्रत केले. गेल्या चार वर्षांपासून पुण्यात हा उपक्रम सुरु आहे.

पिंपरी-चिंचवडच्या नवी सांगवी परिसरात मानवी हक्क संरक्षणच्या वतीने आज पुरुषांची वटपौर्णिमा मोठ्या थाटात पार पडली. श्रीकांत जोगदंड हे हा उपक्रम राबवत आहेत. स्त्रियांप्रमाणे पुरुषांनी वडाला दोऱ्या बांधून स्त्री पुरुष समानतेचा आदर्श ठेवला आहे. पूजा झाल्यानंतर या पुरुषांनी हात पुढे करून सर्व हीच पत्नी मिळू दे यासाठी शपथ घेतली. पुरुषांच्या या उपक्रमाचे महिलांनीही स्वागत केले आहे. (हेही वाचा: वट सावित्री व्रताची सांगता करताना हमखास होणारा आग्रह पूर्ण करण्यासाठी खास वटपौर्णिमा विशेष उखाणे)

आतापर्यंत हा सण फक्त महिलांपुरताच मर्यादित होता, मात्र आता पुरुषही हा सण साजरा करू लागले आहेत. जन्मोजन्मी फक्त हाच पती मिळावा म्हणून नाही तर, जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून पुरुष आता सावित्रीच्या पावलावर पाऊल टाकत आहेत.