नालासोपारा स्फोटक आणि शस्त्रसाठा प्रकरणी (Nala Sopara Explosives Seizure) महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेली व्यक्ती पश्चिम बंगालचा रहिवासी असून, त्याच्यावर सनबर्न संगीत महोत्सवात हल्ल्याचा कट रचल्याचा देखील आरोप आहे.
माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीचे नाव प्रताप जूदिश्तर हाजरा (Pratap Hazra) असे असून, तो पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीचा ठावठिकाणा मिळाल्यानंतर एटीएसच्या पथकाने त्याला दक्षिण 24 परगनातील नैनापूर येथून अटक केली. कोर्टाने आरोपीला 30 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.
प्रताप हाजरावर डिसेंबर 2017 मध्ये पुण्यात झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये, दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मात्र हे नियोजन यशस्वी होऊ शकले नाही. याशिवाय ऑगस्ट 2018 मध्ये नालासोपारा येथे जप्त केलेल्या शस्त्रास्त्र प्रकरणातही आरोपीचा शोध चालू होता. आता कोर्टाने त्याला 30 जानेवारीपर्यंत एटीएसच्या ताब्यात दिले आहे. 10 ऑगस्ट 2018 रोजी एटीएसने सनातन संस्थेचे सदस्य राऊतच्या नालासोपारा बंगल्यामधून 20 आण्विक बॉम्ब, ज्वलनशील पदार्थ, विषाच्या दोन बाटल्या आणि काही कागदपत्रे जप्त केली होती.
या प्रकरणात 25 वर्षीय शरद काळस्कर यांना नालासोपारा येथून अटक करण्यात आली, तर 30 वर्षीय सुंधवा गोंधळेकर यांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यानंतर गोंधळेकरांनी एटीएसच्या पथकाला पुण्यातील एका गोदामाची माहिती दिली, जिथे बेकायदेशीरपणे शस्त्रे ठेवली होती. ही शस्त्रे आणि स्फोटकांचा हेतू हा राज्यात कथित दहशतवादी स्फोट घडवून आणण्याचा होता. याच स्फोटक आणि शस्त्रसाठा प्रकरणात दहशतवादी प्रताप हाजरा याला अटक बंगाल पोलिसांच्या मदतीने आज अटक झाली. दहशतवादी हाजरावर देशी बॉम्बचे प्रशिक्षण आणि इतर स्फोटके तयार केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा: आसाम पोलिसांचे मोठे यश; बंदी घातलेल्या 8 संघटनांमधील 644 अतिरेक्यांचे, 177 शस्त्रांसह आत्मसमर्पण)
या प्रकरणात शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पनागरकर, अविनाश पवार, लीलाधर लोधी, वासुदेव सूर्यवंशी, सुजित रंगस्वामी आणि अमोल काळे अशा एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे.