अकरावी प्रवेशासाठी पुढील वर्षी इन हाऊस कोट्याला कात्री, आरक्षण 103% वर गेल्याने शासनाचा निर्णय
शिक्षणमंत्री विनोद तावडे (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रामध्ये 16% मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि 10% सवर्णांना आरक्षण (EWS) लागू झाले आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये हे आरक्षण लागू झाल्याने आगामी शैक्षणिक वर्षात आरक्षणाची टक्केवारी 103% इतकी झाली होती. परिणामी अकारावीला (FYJC) खुल्या गटात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही अशी धास्ती काही विद्यार्थ्यांच्या मनात होती. यावर आता सरकारने उपाय काढला आहे. महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालय आणि शाळांमध्ये असलेले 20% इन हाऊस कोट्यातील अ‍ॅडमिशन आता 10% केले जाणार आहे. त्यामुळे 7% उर्वरित जागांवर खुल्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल अशी माहिती महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी आज दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या एसएससी(SSC) आणि एचएससी (HSC) च्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी आगामी वर्षातील प्रवेशाबद्दल काळजी करू नये. विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशप्रक्रिया सुकर केली जाईल अशी माहिती देत विद्यार्थ्यंना सध्या परीक्षेवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला विनोद तावडे यांनी दिला आहे.

मुंबईमध्ये 1887 विविध शाखांची कनिष्ठ महाविद्यालयं आहेत. त्यापैकी 639 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इन हाऊस प्रवेश कोटा आहे. त्यामध्येही 306 महाविद्यालयं अल्पसंख्यांक आहेत. 333 वरिष्ठ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं ही बिगर अल्पसंख्यांक आहेत. यांमध्ये इन हाऊस कोट्याद्वारा अकरावीचे प्रवेश दिले जातात. सध्याच्या आरक्षणानुसार सारे गणित केल्यास आरक्षण 103% इतके होते. त्यामुळे शासनाने पुढील वर्षापासून इन हाऊस कोट्याला कात्री लावत ते 10% केले आहे. त्यामुळे खुल्या वर्गाच्या 7% जागा प्रवेशासाठी खुल्या असतील.

महाराष्ट्रातील कनिष्ठ विद्यालयाशी चर्चा करून इन हाऊस कोटा 10% कमी करून सर्वांना प्रवेशासाठी जागा खुल्या करण्यात आल्याची माहिती  विनोद तावडे यांनी दिली आहे.