26/11 Mumbai Terror Attack : तीन दिवस चाललेल्या या हल्ल्याचा असा होता घटनाक्रम
26/11 मुंबई दहशतवादी हल्ला (Photo Credit-File Photo)

Mumbai Terror Attack : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला यावर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणायला हा हल्ला 10 वर्षांपूर्वी झाला होता, मात्र या हल्ल्याच्या जखमा आजही प्रत्येक मुंबईकराच्या काळजावर अजूनही तशाच ताज्या आहेत. 2008 मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 166 लोक मारले गेले, तर शेकडो जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात, मुंबई पोलिसांच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक पोलिसांनाही वीरमरण आले होते. पाकिस्तानमधून आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी हा भयंकर हल्ला केला होता. यापैकी 9 दहशतवाद्यांना ठार मारले गेले आणि अजमल आमिर कसाब याला जिवंत पकडण्यात आले, ज्याला 2012 मध्ये फाशी देण्यात आली.

दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला. समुद्रमार्गे आलेल्या दहा दहशतवाद्यांनी 26 ते 28 नोव्हेंबर 2008 या तीन दिवसांत मुंबईतील या महत्त्वाच्या स्थळांवर घडवलेला नरसंहार स्मृतिपटलाच्या आड कधीही करता येणार नाही.

गेल्या काही वर्षांत भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील अनेक हल्ले मुंबईवर झाले आहेत. या हल्ल्यातील बरेचसे दहशतवादी हवा भरलेल्या तराफ्यावजा बोटींवरुन समुद्रमार्गे शहरात आले. या बोटी समुद्रात उभ्या केलेल्या मोठ्या जहाजावरुन सोडण्यात आल्या होत्या. पैकी असेच 26 नोव्हेंबर रोजी रात्री ८च्या दरम्यान एका अशा बोटीतून आठ तरुण कफ परेडच्या मच्छीमार नगरजवळ आले. 8.20 वाजता याच प्रकारे इतर दहा व्यक्ती अशाच बोटींतून कुलाब्यात उतरल्या.

प्रसिद्ध ज्यू गेस्ट हाउसकडे दोन अतिरेकी, दोन अतिरेकी सीएसटीच्या बाजूला, दोन दहशतवादी हॉटेल ताजमहल येथे गेले आणि उर्वरित दोन टीम्स हॉटेल ट्रॉइडेंट ओबेरॉयकडे गेल्या.

रात्री 9:20 वाजता हल्ला सुरू झाला. ए.के. 47 असॉल्ट रायफली घेउन दोन दहशतवादी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रवासी कक्षात घुसले आणि तेथे गोळ्या चालवून त्यांनी हातबॉम्ब फेकले.

याच सुमारास इतर दोघांनी ताज होटेलमध्ये सात परदेशी नागरिकांसह 15 जणांना ओलिस घेतले, तर ओबेरॉय ट्रायडेंट होटेलमध्ये इतर काही दहशतवाद्यांनी 40 जणांना ओलिस धरले.

28 ला पहाटे 4:22 ला ताजमहाल होटेल पुन्हा पोलिसांच्या आपल्या नियंत्रणात घेतले. यावेळी कमांडोंनी दोन दहशतवाद्यांना ओबेरॉय होटेलमध्ये ठार मारुन इमारतीचा ताबा घेतला.

29 नोव्हेंबर ला  दहशतवाद्यांच्या तावडीतील सर्व ओलिसांची सुखरूप सुटका करण्यात आली, यात नऊ दहशतवादी ठार झाले. पैकी जिवंत राहिलेल्या कसाबचा खटला आर्थर रोड तुरुंगात चालवण्याचा निर्णय 16 जानेवारी रोजी घेण्यात आला.

त्यानंतर चालू झालेल्या खटल्याच्या 3 वर्षांनतर, 10 ऑक्टोबर 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कसाबच्या शिक्षेची अंमलबजावणी रोखली. देवाच्या नावाखाली क्रूर कृत्य करण्यासाठी आपले रोबोसारखे ब्रेनवॉशिंग केले गेल्याचा दावा करत अल्पवयीन असल्याने फाशीची शिक्षा योग्य ठरत नसल्याचा कसाबचा दावा होता. त्यानंतर राष्ट्रपतींनीदेखील कसाबचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर 21 नोव्हेंबर 2012 ला दहशतवादी अजमल अमीर कसाब याला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.