गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2021) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या (Coronavirus) सावटामुळे गेल्या दीड वर्षांपासून गणेशोत्सवावर काही निर्बंध होते. मात्र, यंदा परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्याने भाविकांनी आरोग्याची योग्य ती खबरदारी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वसई-विरार (Vasai- Virar) पोलीसआयुक्तालयाने विसर्जनासाठी खास गाईडलाईन (Guidelines) जारी केल्या आहेत. त्यानुसार, वसई विरारकरांना रात्री आठच्या आतच विसर्जन करणे बंधनकारक असणार आहे. विसर्जन स्थळी केवळ 4 जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ असल्याचे दिसत आहे. यामुळे सरकार, प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. यातच गणेशोत्सवासाठी शासनाच्या सूचनेनुसार वसई-विरार महापालिका आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. हे देखील वाचा- Amravati: बलात्कार पीडित अल्पवयीन गर्भवती मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; आरोपीला अटक, गुन्हा दाखल
गाईडलाईन-
- वसई-विरार महापालिकेने 9 प्रभागात एकून 44 तलाव निश्चित केले असून नागरिकांना शासनाचे नियम पाळून श्री गणेशाचे विसर्जन करावे लागणार आहे.
- गणेशभक्तांना मंडाळात किंवा घरीच आरती घ्यावी लागणार आहे. विसर्जनाच्या स्थळी केवळ 4 जणांना मूर्तीसोबत प्रवेश दिला जाणार आहे.
- रात्री 8 वाजेपर्यंतच विसर्जन करणे सर्वांवर बंधनकारक आहे.
- वसई-विरार, नालासोपारा परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 450 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 750 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. याशिवाय, वाहतूक शाखा, होमगार्ड, दंगलनियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलही तैनात असणार आहेत.
- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व गणेश भक्तांनी शासनाचे सर्व नियम पाळून आजचे विसर्जन आणि पुढील बाप्पाचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे विघ्न डोक्यावर घोंगावत असतानाच शुक्रवारी भक्तांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळात लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. कोरोनाचे संकट लवकर टळावे, हीच कामना मनात ठेवून आणि उत्साहात कुठेही कमतरतान ठेवता भक्तांनी श्री गणेशाचे स्वागत केले आहे.