Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटी यांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात वातावरणाचा कल काय असेल याबाबत नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने हवमान अंदाज (IMD Weather Update) वर्तवला आहे. ज्यामध्ये राज्यातील अनेक प्रदेशांसाठी उष्णतेच्या लाटेचा (Maharashtra Heatwave Alert) इशारा दिला आहे. आयएमडीने नुकत्याच वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत, विशेषतः कोकण (Konkan Temperature Rise), मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमानात (Vidarbha Heatwave Warning) तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना, आहार आणि शेतकीच्या कामांसह आरोग्याची काळजी घेताना नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या राज्यातील आजचे आणि उद्याचे हवामान.

संपूर्ण राज्यात तापमानात वाढ

आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 48 तासांत तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे, तर विदर्भात येत्या पाच दिवसांत कमाल तापमानात 4 ते 6 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे. ही स्थिती अशीच राहील तर उष्णतेची लाठ उद्भव शकते आयएमडीचे माजी शास्त्रज्ञ डॉ. के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या हवामान अपडेटमध्ये पुणे, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे कारण उत्तर महाराष्ट्र आणि वायव्य भारतातील काही भागात पुढील 48 ते 72 तासांत तापमान 40 अंश सेल्सिअस ओलांडू शकते. आरोग्य धोक्यांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्लाही दिला आहे. (हेही वाचा, Maharashtra Heatwave: राज्यात पुढचे 4 दिवस अवकाळी पावसासोबत येणार उष्णतेची लाट, गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन)

कोकणात उष्ण आणि दमट परिस्थिती

पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकणात उष्णता आणि आर्द्रतेचा त्रासदायक अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे. वाढत्या तापमान आणि दमट परिस्थितीसाठी रत्नागिरी, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पिवळ्या रंगाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो, परंतु हवामानाचा मुख्य नमुना उष्ण आणि दमट वारे असेल.

काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

अवेळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा कमी झाला असला तरी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी 5 एप्रिल रोजी हलक्या पावसाचा इशारा कायम आहे. पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि अहिल्यानगरमध्येही तुरळक आणि हलक्या सरींची अपेक्षा आहे.

आयएमडी सल्ला

वाढते तापमान आणि बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयएमडीने नागरिकांना सल्ला दिला आहे. हा सल्ल्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

  • पुरेसं पाणी प्यावे
  • दुपारी उन्हात जाणं टाळावं
  • शक्य असल्यास घरात थांबावं
  • ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची काळजी घ्यावी

आज, उद्या कसे असेल हवामान?

प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, पुढील 24 तासांत तापमानात कोणताही लक्षणीय बदल अपेक्षित नाही. तथापि, 6 एप्रिलपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 3° सेल्सिअस ते 4° सेल्सिअस तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे, त्यानंतर आठवड्याच्या मध्यापर्यंत विदर्भात 4° सेल्सिअस ते 6° सेल्सिअस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.