IIT Bombay मधील 21 वर्षीय विद्यार्थ्यावर बैलांचा हल्ला
Representational Image | (Photo Credits: File Photo)

आयआयटी मुंबई (IIT Bombay) येथे इंटर्नशीप करणाऱ्या एका 21 वर्षीय विद्यार्थ्यावर बैलांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (11 जुलै) रोजी हा विद्यार्थी मोबाईलमध्ये बघत उभा असताना अचानक आलेल्या दोन बैलांनी त्याला धडक दिली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अक्षय पी.एल असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मोबाईलमध्ये बघत उभा होता. अचानक आलेल्या दोन बैलांनी त्याला काही कळायच्या आत धडक दिली. त्यानंतर अक्षय जमिनीवर कोसळला. इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रथम त्याला आयआयटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर विक्रोळी येथील सुशुश्रा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

या घटनेत अक्षयच्या पोटाला जखम झाली असून आता मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे. तसंच पोटाच्या आत कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.