Home Minister Anil Deshmukh | Photo Credits: Facebook)

शेतकऱ्यांना पीक कर्ज (Agriculture Loan) न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे (Criminal Case) दाखल होणार असल्याचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी दिला आहे. सध्या राज्यात पेरणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता भासत आहे. मात्र, अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सरकारने विशेष आदेश निर्गमित केले आहेत. परंतु, असं असतानादेखील अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करणं हा एकमेव उपाय ठरू शकतो - देवेंद्र फडणवीस)

दरम्यान, ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे, अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.