पंकजा मुंडे

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या, तर मी जगणार नाही, असा धमकी देणाऱ्या 38 वर्षीय ट्रकचालकाचा बसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. हा आत्महत्येचा प्रकार असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. किनगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदपूर-अंधोरी मार्गावर बोरगाव पाटीजवळ रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. सचिन कोंडीबा मुंडे (वय 38, रा. येस्तर, जि. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर) असे मृताचे नाव आहे.

या घटनेतील बस चालकाला अटक करण्यात आली असून, हा अपघात होता की आत्महत्या याचा तपास सुरू आहे. बोरगाव पाटी जवळ 'यलदारवाडी नाईट हॉल्ट' येथे बस थांबली होती तेव्हा हा प्रकार घडला. सचिन बसच्या पाठीमागे उभा होता आणि जेव्हा बस रिव्हर्स घेऊ लागली तेव्हा त्याला धडक बसली. किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी सांगितले की, तपासाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जप्त करण्यात आली आहे.

मृत हा अविवाहित असून तो आई-वडील व भावासोबत राहत होता. ‘पंकजा मुंडे निवडणुकीत हरल्या तर सचिन जिवंत राहणार नाही’, असा दावा करणारा एक व्हिडिओ त्याने जारी केला होता. त्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांच्याकडून 6,553 मतांनी पराभव झाला. बीडची लढत अतिशय चुरशीची झाली होती. रात्री उशीरापर्यंत याठिकाणी मतमोजणी सुरू होती. 4 जून रोजी रात्री उशीरा निवडणूक आयोगाकडून बीडचा निकाल जाहीर करण्यात आला होता. (हेही वाचा: पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्री करण्याची बीडमधल्या कार्यकर्त्यांची मागणी, आज परळीत बंद)

आता निकालानंतर काही दिवसातच सचिनचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, निवडणुकीच्या निकालानंतर सचिन दु:खी झाला होता आणि गप्प-गप्प होता. शनिवारी सकाळी गावातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.