Raju Shetti: एफआरपी थकवला तर, साखर कारखाने बंद पाडणार; स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा इशारा
राजू शेट्टी (Photo Credit : Facebook)

ऊसतोड मजुरांना 14 टक्के वाढीव मजुरी मिळाली त्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही 14 टक्के वाढीव एफआरपी (FRP) द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. कोल्हापुरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या 19व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. एवढेच नव्हेतर एफआरपी थकवला तर साखर कारखाने बंद पाडणार, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. याशिवाय, यंदा शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा. ज्या साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीचा एफआरपी अजून दिलेला नाही त्यांचे कारखाने सुरु होऊ देणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

उस परिषदेतनंतर राजू शेट्टी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, ते म्हणाले होते की, ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी द्यायला उशीर किंवा थकवली आहे. त्यांच्याविरोधात मी औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्यानंतर ज्यांनी एफआरपी देण्यास 14 दिवसांपेक्षा अधिक उशीर केला आहे, त्यांच्याकडून न्यायालयाने 15 टक्के व्याजदराने रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अमलबजावणी करण्याची मागणी आम्ही साखर आयुक्तांना करणार आहोत. तसेच साखर कारखान्यांनी एफआरपी थकवला तर आम्ही कारखाना बंद पाडू असाही इशारा शेट्टी यांनी दिला आहे. हे देखील वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत काही पक्षांकडून राजकीय षडयंत्र केले जात आहे; अशोक चव्हाण यांचा आरोप

येत्या 5 नोव्हेंबरला देशभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रात आंदोलन करणार असून आम्ही रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी रस्ता रोखून धरणार आहोत. किमान दोन तास शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करावे,असेही आवाहन राजू शेट्टी यांनी यावेळी बोलतांना केले आहे.