Devendra Fadnavis: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)मुद्दा अजूनही धगधगत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे(Manoj Jarange) सातत्याने करत आहेत. आंदोलन आणि उपोषण काळात मनोज जरांगे यांनी अनेकवेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांच्यावरही आरक्षणात अडथळा आणत असल्याची टीका केली. सरकारकडूनही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकरावर केला आहे. आता या सर्व आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी म्हटल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन', असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. (हेही वाचा: Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा सल्ला)
मनोज जरांगे यांनी काय म्हटलं?
आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. त्यांनी म्हटलं की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षण देऊ इच्छित आहेत. मात्र, त्यांना देवेंद्र फडणवीस थांबवत आहेत’. मनोज जरांगे यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल आहे.त्याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. मनोज जरांगे यांचे आरोप खोटे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. (हेही वाचा: Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिले ही शासनाची भूमिका, विकासाच्या प्रश्नांबाबत काढला जातोय चर्चेतून मार्ग- Devendra Fadnavis )
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मला कल्पना आहे की, मनोज जरांगे यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. मात्र, हे देखील सांगितलं पाहिजे की राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. मी त्याही पुढे जाऊन सांगतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आहोत. त्यांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटलं की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न मी थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
'आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले, ते एकतर मी घेतले किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. तसेच मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेलो आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाणीपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न हा अयोग्य आहे. आता मी पुन्हा एकदा सांगतो की जर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, त्यांना मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. पण त्यामध्ये मी अडथळा आणला, मी निर्णय होऊ दिला नाही, तर त्याच क्षणी राजीनामा देईल आणि राजकारणामधूनही सन्यास घेईल', असं देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे.