'मला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका
Raj Thackera And Uddhav Thackeray | (Photo credit: Archived, edited, representative images)

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबईत (Mumbai) मोर्चा निघाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 23 जानेवारी रोजी पक्षाच्या झेंडासह आपल्या विचारधारेतही बदल केला आहे. तसेच यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या वाटेवर चालणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाला साधला आहे. आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. शिवसेनेने कधीही त्यांच्या झेंड्यात बदल केला नाही, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच मरेपर्यंत भगवा सोडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी तिन्ही पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. महत्वाचे म्हणजे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करत शिवसेनाने हिदुत्व सोडले, अशा चर्चांनी सध्या जोर धरला आहे. नुकतीच शिवसेना आमदारांची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसी संदर्भात सर्व आमदारांना मार्गदर्शन केले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावर भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मला माझे हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. कारणे ते बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही. एक माणूस एक झेंडा आमचे ठरलेले आहे. जगाला ठाऊक आहे. आपले हिंदुत्व काय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. काही लोक म्हणत आहेत की, शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्याने आम्ही हिंदुत्व सोडले आहे. पण हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- 'दगडाला दगडाने तर तलवारीला तलवारीने यापुढे उत्तर देणार', आझाद मैदानातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा घुसखोरांना सज्जड दम

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही मनसेच्या नव्या भुमिकेवर टीकास्त्र सोडले आहे. मुंबईतील आजच्या मोर्चामागे कुणीही असले तरी काही फरक पडत नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यांना इकडून तिकडे, तिकडून इकडे जाण्याचा अधिकार आहे. पण आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. घुसखोरांच्या ट्रेन भरल्या जातात. लोकांना तिकडे उतरवतात. परत ते तिकडून बसतात आणि इकडे येतात. याच्यावर मार्ग काढण्यासाठी भारत सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज मनसेचा मोर्चा निघाला होता. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यभरातील मनसैनिक सहभागी झाले होते. राज ठाकरेंच्या सभेसाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य स्टेज उभारण्यात आला असून दोन लाख जणांसाठी आसनव्यवस्था असल्याचाही दावा केला जात आहे.