विनोद तावडे (Photo Credits: ANI)

मी विधान परिषदेची (Legislative Council) उमेदवारी मागितलीचं नव्हती, त्यामुळे माझ्या नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा भाजपचे नेते व माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केला आहे. भाजपमध्ये विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने भाजप नेते एकनाथ खडसे, राम शिंदे आदी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. याच मुद्दयावरून विनोद तावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी विनोद तावडे यांनी सांगितलं की, एकनाथ खडसे यांना विधान परिषदेच्या तिकिटाची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. परंतु, तिकीट नाकारलं म्हणजे पक्षाने दूर केलं असं नाही. एकनाथ खडसे तसेच पंकजा मुंडे यांच्या कामाबद्दल भाजपला आदर आहे. त्यांना पुढे चांगली संधी मिळेल, असं मत विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे. (हेही वाचा - राज्यात काल एका दिवसात 5 हजार 434 ग्राहकांना घरपोच मद्य विक्री; नागपूर व लातूर येथील ग्राहकांनी मागवली सर्वात जास्त दारू)

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे आम्हाला तिकीट मिळावं म्हणून आग्रही होते. मात्र, केंद्रीय संसदीय मंडळाने वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे त्या दोघांनी मिळून आमचं तिकीट कापलं असं वाटत नाही. विधानसभा तसेच विधान परिषदेच्या उमदेवारीबद्दलचे सर्व निर्णय भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेले आहेत, असंही तावडे यांनी यावेळी सांगितलं.