
सध्या राज्यात एक नवा वाद दिवसेंदिवस चिघळू लागला आहे. गेल्या आठवड्यात विधानसभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीच्या नेत्याचे वक्तव्य म्हणजे संभाजी महाराजांचा अपमान असल्याचा दावा भाजपने केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या कथित वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनेही केली.
त्यानंतर आता भाजपच्या राज्यव्यापी निषेधाला न जुमानता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, 'छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक असल्याच्या' आपल्या विधानावर ठाम आहेत. याबाबत त्यांनी माफी किंवा खेद व्यक्त केला नाही.
पवार यांच्या वक्त्यव्याबाबत भाजपने त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा मागितला होता. त्याबाबत पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, मला भाजपने नव्हे तर राष्ट्रवादीच्या 53 आमदारांनी विरोधी पक्षनेते केले आहे. त्यामुळे भाजपला माझा राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही. यावेळी त्यांनी भाजप आणि ‘मास्टरमाईंड’वर पक्षाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रभर निदर्शने करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मी वादग्रस्त विधान केले नाही परंतु भाजपचे मंत्री, आमदार आणि राज्यपाल यांनी राष्ट्रपुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांपासून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्याविरुद्ध मोर्चा काढला गेला.
ते म्हणाले, मी विधानसभेत भाषण केले तेव्हा त्यांनी (भाजपने) आक्षेप घेतला नाही. दोन दिवसांनी माझ्याविरोधात निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. संयोगाने सूत्रधार त्यावेळी तिथे नव्हता. त्यानंतर आंदोलन सुरू झाले. यावेळी त्यांनी याआधी राज्यपाल व इतरांनी महापुरुषांच्या केलेल्या अपमानाबाबत त्यांच्यावर कारवाई कधी होणार? असा सवालही उपस्थित केला. (हेही वाचा: शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त)
ते म्हणाले, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मी माझे मत मांडले आहे, ते स्वीकारा किंवा नाकारा. मी कोणताही गुन्हा केलेला नाही किंवा चुकीचे बोललो नाही. अनेक जणांना ‘धर्मवीर’ ही पदवी देण्यात आली आहे. काहींचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता धर्मवीर भाग 2 येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य रक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली. त्यामुळे एकच स्वराज रक्षक आहे आणि दुसरा कोणीही असू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.