हैदराबाद (Hyderabad) येथे काही दिवसांपूर्वी डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्काराने देशात संतापाची लाट उसळली होती, या प्रकरणात आज सकाळी तेलंगणा पोलिसांनी (Telangana Police) चार आरोपींना थेट गोळ्या झाडून ठार केले. या एन्काउंटर (Encounter) नंतर देशभरात पोलिसांचे कौतुक होत आहे तर काही दिग्गज मंडळींकडून पोलिसांनी कायदा विरोधी कृत्य केल्याचे म्हणत या घटनेचा विरोध केला जात आहे. या एकूण प्रकरणात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत अपेक्षेप्रमाणे पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे. राज यांनी एक खास ट्विट करत कधी कधी "ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो" अशी भावना व्यक्त केली आहे.(हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर करणारे पोलिस सिंघम वी.सी. सज्जनार कोण आहेत; जाणून घ्या)
हैदराबाद मध्ये घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत घटनेचा खुलासा केला. आरोपींना बलात्कार घडलेल्या ठिकाणी नेले असताना त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला इतकेच नव्हे तर त्यांनी पोलिसांच्या बंदुका चोरून त्यांच्यावरच गोळीबार देखील केला यावेळी आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचलले असे पोलिसांनी सांगितले.
राज ठाकरे ट्विट
कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो. #Hyderabad #Encounter #JusticeForDisha
— Raj Thackeray (@RajThackeray) December 6, 2019
दरम्यान, राज यांच्याशिवाय भाजपचे नेते उदयन राजे भोसले, चित्रा वाघ यांच्याकडून सुद्धा पोलिसांच्या या हिमंतीचे कौतुक करण्यात आले आहे. तर नागरिकांच्या उत्साहाला तर काही मापदंडच उरलेला नाही. हैदराबाद येथे घटनास्थळी देखील पोलिसांना उचलून घेत त्यांच्यावर पुषवृष्टी करत नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.