Representational Image (Photo Credits: Flickr)

गेले 6 महिने लॉकडाऊनमुळे (Lockdown) बंद असलेली महाराष्ट्रातील हॉटेल्स (Hotels), बार (Bar) आजपासून पुन्हा सुरु झाली आहेत. यात राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार, 50% क्षमतेसह ही हॉटेल्स सुरु राहणार आहेत. यामुळे आज मुंबईसह अनेक जिल्ह्यात हॉटेल्स सुरु झाल्याने खवय्यांना अतिशय आनंद झाला आहे. मात्र नाशिक (Nashik) मध्ये हॉटेल्स, बार सुरु झाली असली तरीही कोरोनाचे सावट लक्षात घेता येथील जिल्हाधिका-यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. TOI ने दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यात सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरन्ट (Restaurant) सुरु राहतील. अनलॉक 5 च्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याधिका-यांनी याबाबत आदेश दिले असून त्याची नीट अंमलबजावणी होत आहे का याकडे अधिका-यांना लक्ष देण्यास सांगितले आहे.

आजपासून म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, बार सुरु करण्यात आली असून सरकारने विशेष नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही यावर प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे. त्यामुळे हॉटेल धारकांनीही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. Unlock 5: महाराष्ट्रात आजपासून ग्राहकांसाठी खुली झाली हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि बार; जाण्यापूर्वी सरकारच्या 'ह्या' महत्वाच्या नियमांची करा उजळणी

गेले अनेक महिने हॉटेल्स, बार बंद असल्यामुळे या मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ते भरून काढण्यासाठी सरकारने योग्य ती मदत करावी असे हॉटेल संघटनांचे म्हणणे आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात वेळेचे बंधन घालणे हॉटेल्स,बार मालकांना रुचले नसून त्यांच्या संघटनांनी यास विरोध दर्शवला आहे. नाशिक जिल्हाधिका-यांनी घालून दिलेल्या वेळेत अनेक ग्राहक हॉटेल्सकडे पाठ फिरवतील. ज्यामुळे हॉटेल, बार च्या आर्थिक नुकसान भरून निघणार नाही उलट आणखी नुकसान होईल असे त्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे हॉटेल, बार व्यवसायांचा आर्थिक दृष्ट्या नीट विचार करावा अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील हॉटेल संघटनांनी केली आहे.