Honeybee Attack On Sayaji Shinde: अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावर पुणे- बंगळुरु महामार्गावर मधमाशांचा हल्ला
Sayaji Shinde | (Photo Credit: Facebook)

अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला (Honeybee Attack On Sayaji Shinde) केला आहे. पुणे- बंगळूर महामार्गाचे (Pune-Bangalore Highway) रुंदीकरण कामादरम्यान वृक्षांचे पुनर्रोपन करत असताना शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. महामार्गावरील तासवडे गावानजिक ही घटना घडली. मधमाशांचा हल्ला होतो आहे हे लक्षात येताच शिंदे यांना तातडीने त्यांच्या वाहनात बसविण्यात आले. वाहनात बसल्यामुळे सयाजी शिंदे यांच्यावर अधिक धोकादायक परिस्थिती ओढावली नाही. त्यामुळे ते सुखरुप आहेत, असे सांगम्यात येत आहे.

पर्यावरण आणि वृक्षारोपन, झाडांचे संवर्धन यांबाब सयाजी शिंदे नेहमीच आग्रही राहिले आहेत. सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपणासाठी राज्यभर विविध उपक्रम राबवले आहेत. दुष्काळी भागातही त्यांनी निसर्गाशी संबंधित अनेक कामे केली आहेत. प्रामुख्याने वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन याबद्दल सयाजी शिंदे अधिक सक्रीय असतात. प्रामुख्याने वृक्षांच्या देशी वाणाचे वृक्षारोपण करण्यासाठी सयाजी शिंदे आणि त्यांच्या गटाने अधिक भर दिला आहे. सयाजी शिंदे आपल्या अभिनय कारकिर्दीसोबतच सामाजिक कार्यातही सहभागी असतात. त्यांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या भल्यासाठी काम मोठे केले आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करणार्‍या अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आहे.

अभिनेता सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी (TV) अभिनेते आहेत. शिंदे यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म 13 जन्म 1959 रोजी सातारा जिल्ह्यातील साखरवाडी येथे झाला. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी त्यांनी विविध ठिकाणी नोकऱ्याही केल्या. त्यांनी तेलुगू, मराठी, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती, हिंदी, भोजपुरी अशा विविध भाषांमधील चित्रपटात अभिनय केला आहे. त्यांच्या अभिनयाचे अनेक अभ्यासक, समिक्षकांनी कौतुक केले आहे. शिवाय अभिनयाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. सयाजी शिंदे हे एक अष्टपैलू अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या प्रतिभा आणि समर्पणाने भारतीय चित्रपट उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.