Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: ANI)

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट देशासमोर उभे ठाकले आहे. कोविड-19 (COvid-19) च्या जागतिक आरोग्य संकटाचा प्रभाव महाराष्ट्र राज्यात सुरुवातीपासूनच अधिक होता. त्यामुळे राज्याच्या पोलिस यंत्रणेवर अधिक जबाबदारी आणि ताण होता. दरम्यान महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) दलातील सर्व पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत आपले कर्तव्य पार पाडले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिस वर्गाला गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी वेळोवेळी कौतुकाची थाप दिली आहे. आता गृहमंत्र्यांनी खास व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्र पोलिस दलाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.

कोविड-19 च्या काळात आपल्या कर्तव्यापलिकडे जावून महाराष्ट्र पोलिसांनी काम केले. ते भावस्पर्शी क्षण दाखवणारा व्हिडिओ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, "कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्र पोलीस लढवय्ये शिलेदार ठरले आहेत. अनेक कामातून वर्दीतील संवेदनशीलता त्यांनी दाखवून दिली आहे. या लढ्यात महाराष्ट्र पोलिसांचे असणारे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कार्याचा मला पोलीस दलाचा कुटूंबप्रमुख म्हणून सार्थ अभिमान आहे." (कोरोना संकटाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गार)

Anil Deshmukh Tweet:

कोरोना व्हायरस संकटाचा सामना करताना पोलिस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. तर काहीजण कोरोनावर यशस्वीरीत्या मात करुन पुन्हा एकदा सेवेत दाखल झाले आहेत. दरम्यान कोविड-19 चे संकट अद्यापही राज्यात कायम आहे. महाराष्ट्रात एकूण 254427 कोरोना बाधित असून 140325 रुग्ण त्यातून बरे झाले आहेत, तर 103516 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यात कोरोना संसर्गामुळे एकूण 10289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.