राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी 2021 या नववर्षाचे स्वागत महाराष्ट्र पोलिसांसोबत साजरे केले. त्यासाठी अनिल देशमुख पुणे पोलीस नियंत्रण कक्ष (Pune Police Control Room ) विभागात गेले. या वेळी देशमुख यांनी स्वत: नागरिकांच्या तक्रारींचे फोन कॉल स्वीकारले आणि पुणेकरांना एक सुखद धक्का दिला. (Anil Deshmukh Celebrate New Year 2021 in Pune Police Control Room ) 'हॅलो मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय' हा आवाज ऐकून काही काळ पुणेकरांनाही आपल्या कानावर विश्वास बसला नाही.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांसोबत केकही कापला आणि नववर्षाचे स्वागत केले. या वेळी गृहमत्री म्हणाले की, कोरोना व्हायरस संकट काळात पोलिसांवर विशेष ताण होता. या काळात आपण खूप काम केले. तुम्ही नक्कीच थकला आहात. परंतू, तरीही आपण मोठ्या हिमतीने काम केले. या पुढचा काळही एकत्र राहू. एकत्र राहून लढाई लढू. महाराष्ट्र कोरोनामुक्त करु, अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी पोलिसांना साद घातली आणि भक्कम विश्वासही दिला.
अनिल देशमुख यांनी पुणे पोलीस नियंत्रण कक्षात हजेरी लावली त्या वेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त आणि इतरही अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा, Maharashtra Police Recruitment 2021: महाराष्ट्रात लवकरच 5 हजार 292 पोलीस हवालदार पदांची भरती होणार- अनिल देशमुख)
नव वर्षाचे स्वागत करत असताना कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. नाक्यानाक्यावर आणि चौकाचौकात वाहनांची तपासणी सुरु होती. प्रामुख्याने मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करताना दिसत होते.