होळीचा (Holi) सण आता अगदी 8-15 दिवसांवर वर येऊन ठेपला आहे. कोकणात शिमगोत्सवाची विशेष लगबग असते. शिमगा साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमनी गावाला जातात. मग त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष ट्रेन चालवल्या जातात. काही दिवसांपूर्वी कोकणात जाण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे कडून विशेष ट्रेन देखील सोडण्यात आल्या. पण यामधून आता रोहा-चिपळूण- रोहा मेमूच्या (Roha Chiplun Roha Memu) होळी विशेष फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दिवा-रोहा धावणाऱ्या गाडीचा विस्तार चिपळूपर्यंत करण्यात आला होता. मात्र ही गाडी दिव्याहूनच भरून येणार असल्याने रोहाला प्रवाशांना गर्दी मिळणार यामुळे प्रवाशांनी विस्तारित गाडीला विरोध करून स्वतंत्र गाडी चालवण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने रोहा-चिपळूण होळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली. मात्र आता ही 01597/ 01598 विशेष गाडी रद्द झाली आहे. Special Trains for Holi 2024 on Konkan Railway: होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन्स धावणार; इथे पहा वेळापत्रक .
गणेशोत्सवाप्रमाणेच होळीच्या सणाला देखील शिमगा साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई, पुण्यातून चाकरमनी गावी परततात. शिमग्याला होळी पेटवण्यासोबतच पालखी नाचवणं यासह अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. कोकणातील ही मज्जा लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं येतात. मध्य रेल्वेकडून होळीच्या निमित्ताने 112 विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - थिविम, पनवेल - सावंतवाडी, पनवेल- थिविम अशा गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांचे बुकींग ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून सुरू आहे. www.irctc.co.in वर तिकीट बुकिंग सुरू आहे.