मुंबई (Mumbai) मध्ये होळीचा रंग बेरंग करणारी एक घटना समोर आली आहे. धुलिवंदनाच्या पूर्वसंध्येला विलेपार्ले ( Vile Parle) भागामध्ये एका 41 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यावर पाण्याचा फुगा लागून तो फूटल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत व्यक्ती शेअर ट्रेडिंग फर्म मध्ये काम करत होता. कुटुंबियांसाठी नजिकच्या दुकानातून पुरणपोळी आणायला गेला असता त्याच्या डोक्याला फुगा लागला आणि तो जागीच कोसळला. बेशुद्ध अवस्थेमध्ये त्याला नजिकच्या कुपर हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले पण त्याला वाचवण्यात यश आलं नाही.
पोलिसांनी या घटनेबाबत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आहे. तर कुटुंबिय पोस्ट मार्टमच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. मृत व्यक्तीचं नाव दिलीप धावडे आहे. तो विलेपार्ले पूर्व भागात सिद्धिविनायक सोसायटीचा रहिवासी होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना सोमवार 6 मार्चच्या रात्री 10.30 ची आहे. स्थानिक त्या दिवशी होलिका दहनाची तयारी करत होते. तर दोन गट पाण्याचे फुगे फेकून हा सण साजरा करत होते. दिलीपच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे. दिलीपच्या कुटुंबीयांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. ज्या भागात ही घटना घडली आहे तेथे सीसीटीव्ही नाही त्यामुळे आता पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
मुंबई मध्ये यंदा कोविड 19 संकटानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधाशिवाय पूर्वीप्रमाणे जल्लोषात होळीचे, धुलिवंदनाचे सेलिब्रेशन पार पडले. या सेलिब्रेशदरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.