शिवसेनेचे आमदार, मंत्री एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार; उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे करणार पुराची पाहणी
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता वर्तवली आहे. येत्या 48 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता कुठे पंचगंगेची पातळी कमी होत होती इतक्यात या बातमीने पुन्हा एकदा प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यासाठी शिवसेना आपले सर्व राजकीय कार्यक्रम थांबवत आहे.

एक आठवडापेक्षा जास्त सतत पडत असलेल्या पावसाचा तडाखा कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना चांगलाच बसला आहे. सांगलीतर पुराने 2005 सालचा रेकॉर्ड मोडला आहे. अशा परिस्थितीत महाजनादेश, शिवस्वराज्य अशा राजकीय यात्रा थांबवण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या भागात जनआशीर्वाद यात्रेसाठी जाणार होते, मात्र आता ते पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. (हेही वाचा: कोल्हापूर, सांगलीसह सातारा येथे मुसळधार पावसाची शक्यता, 48 तासांचा रेड अलर्ट जारी; मदतीचा ओघ सुरू)

पूरग्रस्त भागातील लोकांना मदतीचा हात म्हणून, शिवसेनेचे सर्व आमदार व मंत्री यांनी आपले एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांच्या संपर्कात असून ते पूरग्रस्त नागरिकांना मदत करत आहेत अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.