New India Co-operative Bank Scam (फोटो सौजन्य - ट्विटर)

New India Co-operative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील (New India Co-operative Bank Scam) आरोपी हितेश मेहताबाबत (Hitesh Mehta) मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केलेल्या चौकशीत हितेश मेहतासंदर्भात काही खुलासे करण्यात आले आहेत. हितेश मेहता एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पैसे ट्रान्सफर करताना चोरी करायचा. पैसे ट्रान्सफर करताना हितेश गाडीतून पैसे काढून घरी घेऊन जायचा. आरोपी हितेश मेहता याच्यावर प्रभादेवी शाखेतून 112 कोटी रुपये आणि गोरेगाव शाखेतून 10 कोटी रुपये लाटल्याचा आरोप आहे. हितेश मेहता यांना सुनावणीसाठी मुंबईच्या हॉलिडे कोर्टात आणण्यात आले आहे.

हितेश मेहताला अटक -

शनिवारी 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली हितेश मेहताला अटक करण्यात आली आहे. शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) तीन तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर मेहताला अटक करण्यात आली. बँकेच्या कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी शुक्रवारी मध्य मुंबईतील दादर पोलिस ठाण्यात जाऊन निधीच्या गैरवापराची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, मेहता यांनी इतर सहकाऱ्यांसह एक कट रचला आणि बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव कार्यालयांच्या तिजोरीत ठेवलेल्या पैशातून 122 कोटी रुपये हडप केले. (हेही वाचा -New India Co-op Bank Case: मुंबईमधील न्यू इंडिया को-ऑप बँकेचा महासंचालक हितेश मेहताने केला 122 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार; दादर पोलिसांनी दाखल केला गुन्हा. )

मेहता यांना या प्रकरणासंदर्भात त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी तपास यंत्रणेच्या दक्षिण मुंबई कार्यालयात बोलावण्यात आले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुरुवारी सहकारी बँकेवर अनेक निर्बंध लादले. शुक्रवारी आरबीआयने बँकेचे संचालक मंडळ एका वर्षासाठी बरखास्त केले आणि तिचे कामकाज व्यवस्थापित करण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली. याशिवाय, प्रशासकाला मदत करण्यासाठी सल्लागारांची एक समिती देखील नियुक्त करण्यात आली आहे. (हेही वाचा - New India Co-operative Bank Row: EOW कडून GM Hitesh Mehta ला अटक; 122 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप)

बँक घोटाळ्याप्रकरणी मेहता आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNC) कलम 316 (5) (सार्वजनिक सेवक, बँकर्स आणि इतर व्यक्तींकडून गुन्हेगारी विश्वासघात) आणि 61 (2) (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. एजन्सीने चौकशी सुरू केली आहे. या सहकारी बँकेच्या 28 शाखांपैकी बहुतेक शाखा मुंबई महानगर क्षेत्रात आहेत.