राजकारणात काहीही घडू शकतं. फक्त समीकरणे जुळायला हवीत. ती जर का जुळली तर ऐतिहासिक निर्णय (Historical Political Decisions) घेतले जातात. राज्याच्या राजकारणातही अशीच घटना घडली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) चक्क कम्युनिस्ट पक्षाने (CPI) पाठिंबा दिला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (Communist Party of India) एक शिष्टमंडळ आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर गेले. मातोश्रीवर झालेल्या भेटीत या शिष्टमंडळाने 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मातोश्रीवर पोहोचलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मिलिंद रानडे, प्रकाश नार्वेकर, विजय दळवी, बबली रावत आदीचा समावेश होता. भाकपच्या शिंष्टमंडळाची भेट शिवसेनेच्या खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आमदार रविंद्र वायकर, सुनील प्रभू, रमेश कोरगावंकर यांनी घेतली. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास हे शिष्टमडळ मातोश्रीवर आले. या शिष्टमंडळाने आपला पाठिंबा शिवसेनेच्या उमेदवारा असल्याचे पत्र दिले.
ट्विट
भाकपचे मुंबई सचिव कॉ. मिलिंद रानडे, कॉ. प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, व्यापारी संघटनेचे नेते विजय दळवी आणि बबली रावत यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना पाठींबा जाहीर केला. pic.twitter.com/DWZCcbONpn
— Shivsena Communication (@ShivsenaComms) October 12, 2022
शिवसेनेमध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी होत आहेत. मराठा सेवक संघानेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेस पाठिंबा दिला आहे. आता डाव्या पक्षांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात भाजप आणि शिंदे गट विरुद्ध महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष असेही चित्र पाहायला मिळू शकते.